Wednesday, August 5, 2009

अंतिम लक्ष्य : निश्चिन्त होणे

अंतिम लक्ष्य : निश्चिन्त होणे
श्री गुरुदेव

भक्ति करावी म्हणजे नेमके काय करावे?

तर मनात आपल्या उपास्य दैवतेचे (सर्वांत आवडणारे एकच उपास्य दैवत निवडून) स्मरण करून अतिशय कृतज्ञतेच्या भावाने अष्ट सात्विक भावांपैकी निदान १-२ तरी भाव जागृत करावे.

आपल्या उपास्य दैवताची प्रार्थना करून, सात्विक भावाने हृदयापासून कळवळून "माझी भक्ति वाढू दे" असे सांगावे. "माझे चित्त शुद्ध होऊ दे, त्यावरील सर्व अंध:कार दूर होऊ दे, माझे चित्त प्रकाशमय होऊ दे" अशी प्रार्थना जर रोज केलीत, मनापासून केलीत, हृदयापासून कळवळून केलीत तर तुमच्यात व ईश्वरात जे अन्तर आहे ते कमी होत जाईल.

संपूर्ण जीवन म्हणजे एक खेळ आहे, स्वप्न आहे असेच तुम्हाला भासु लागेल.

तुमच्यातील व ईश्वरातील अन्तर हे तुमच्या मनातील सकारात्मक भावाच्या, भक्तिच्या, प्रेमाच्या प्रमाणावर अवलंबून असते. मनात दया, क्षमा, शान्ति, करुणा व प्रेम या भावांचे प्रमाण जितके अधिक तितके तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाता. या भावांमुळे तुमचे जीवन त्या प्रमाणाइतकेच रसमय, आनन्दी, चिन्तामुक्त व श्रद्धायुक्त बनत जाते.

या भावांचे प्रमाण जितके वाढेल तेवढे तुमचे ह्रदय उल्हसित व शांत बनत जाईल. आपल्या उपास्य देवावर तुमची श्रद्धा जितकी जास्त तेवढे तुम्ही निश्चिन्त होत जाल. त्या श्रद्धेच्या प्रमाणात तुमच्या मनावरील धुळ, अंधार हळुह्ळू झटकला जाईल.

तुमचे प्रेम तुमच्या देवावर जितके उत्कट असेल त्या प्रमाणात तुमच्या मनात प्रकाश होत जाईल. अधिक तुमच्यातील अविश्वास, संशय, चिंता, भीती इत्यादि सर्व नकारात्मक भावना हळुह्ळू नष्ट होत जातील. " हे जे शांत वाटते, ते माझ्या केवळ देवावरील श्रद्धेमुळे" असं आपण म्हणु लागतो.

जसजसा हृदयाकाशात प्रकाश होत जाईल तसतसा ईश्वर आपल्या अधिक निकट येत जाईल. हे कशामुळे? तर केवळ उत्कट श्रद्धेमुळे.

आणि त्यावेळी “Cast thy burden upon the Lord and go free!” हे वाक्य नुसते एक saying वा quotation म्हणून रहाणार नाही, तर ते तुम्हाला जगता येईल, अनुभवता येईल. त्याची प्रचिती घेता येईल.

मग कितीहि संकटं आली तरी तुम्ही एकटे नसणारच. तुमचा ईश्वर तुमच्या बरोबर असेल.

अशा प्रकारे उत्कट भक्तिने जेव्हा तुम्ही त्याच्या अगदी जवळ जाल, त्यावेळी तो तुमचा आवडता देव तुमच्यावर किती प्रेम करतो याची प्रचिती देईल. तुम्हाला त्याच्या प्रेमामध्ये जखडून ठेवील. नंतर तुम्ही परत त्या नकारात्मक वैचारिक जगात जाऊच शकणार नाहीत.

तुम्हाला मग अशक्य असे काहीच वाटणार नाही. आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचे सार्थक करून घेण्याचा मार्ग सापडेल. तुम्हाला काही करण्याची आवश्यकताच उरणार नाही. सर्व काही तोच करेल. तुमच्या भल्यासाठी. तोच तुम्हाला श्रद्धेच्या मार्गावरून पूर्णशुद्धतेकडे घेऊन जाईल. तुमची शुद्ध होण्यासाठी जेव्हढी ऊत्कट ईच्छा असेल त्याप्रमाणात तो सर्व काही उपलब्ध करून देत जाईल. तुमच्यासाठी. तुम्ही फ़क्त ऊत्कट भक्ति करणे हेच आपले काम समजावे व मनातले सर्व त्याला सांगत जावे, मित्राप्रमाणे.
त्याप्रमाणे जर तुमची भक्ती वाढत गेली तर तुमचे कल्याण झालेच म्हणून समजा. तुमच्या जीवन जगण्याचेही सार्थक होईल.

जीवनाचे सार्थक कशात आहे? तर ते आत्मसाक्षात्कारात.
ज्यावेळी आपला आत्मा त्या परमप्रिय परमशुद्ध ॐकार स्वरूपात, परमात्म्यात मिसळून जाईल, अगदी जिवंतपणीच. त्या परमात्म्यात, त्याच्या मोठ्या मनात आपले छोटे मन मिसळून जाईल, विलीन होईल व ते तसं होणं हेच आपले अंतिम लक्ष्य असावयास हवे. आपले जीवन हे त्यासाठीच त्याने दिले आहे हे. या सुंदर नरदेहाचे हेच अंतिम ध्येय ठेऊन वागल्यास तुमचा परमेश्वर तुमच्यावर खुश होईल. व एकदा का तो प्रसन्न झाला की तो तुमच्यावर त्याच्या प्रेमाचा नुसता वर्षाव करून थांबणार नाही तर तो तुम्हाला त्याचंच रूप बहाल करेल. तेव्हा आपण स्वत:च परमात्मरूप बनू.

पण हे केव्हा तर ज्यावेळी त्या परमप्रिय परमात्म्याचेच प्रतिबिंब असलेला आपला आत्मा (जीवात्मा) खूष होईल असे आपण वागत गेलो तर. आपला आत्मा (ज़मीर) आपल्याला प्रत्येकवेळी शुद्ध वागण्याचा सल्ला देत असतो. त्याप्रमाणे जर आपण वागत गेलो तर आपण शुद्धतेच्या व भक्तीच्या पायर्‍या झपाट्याने चढून जाऊ. या मार्गावर आपली चिकाटी किती आहे हे पडताळून पाहण्यासाठी अनेक दु:ख व संकटांना सकारात्मकरीत्या तोंड द्यावे लागेल. म्हणजे दु:खामुळे, संकटांमुळे तुम्ही गांगरून जाता, चिंता करता, लोकांच्या सहानुभूतीची अपेक्षा करता की दुसर्‍या बाजूने विचार करता? म्हणजे मनापासून हॄदयापासून कळवळून ईश्वराची प्रार्थना करता. त्याच्यावर श्रद्धा ठेऊन विश्वास ठेऊन पूर्ण खात्रीने निश्चिंत होऊन दुसर्‍यांना धीर देता, स्वत:चे व दुसर्‍याचेही मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करता, शांत रहाता हेच त्या आपल्या ऊपास्य देवाला पडताळून/ तपासून पहायचे असते.

एकदा त्याची खात्री झाली की अमुक माणूस चांगल्या बाजूने विचार करतो की तो त्याची श्रद्धा किती खोल आहे हे तपासून पहातो. व त्याला त्या मार्गावर जास्तीत जास्त दॄढ करीत जातो.

अर्थात या ज्या पायर्‍या आहेत आपल्या शुद्ध स्वरूपाकडे जाण्याच्या त्या पायर्‍या चढून जाण्यासाठी ठराविक प्रारब्द्ध जे असते, ते भोगावेच लागते. जेव्हा ईश्वराने ठरविलेले एखाद्या पायर्‍यांवरील भोग संपतात तेव्हाच त्याला वरच्या पायरीवर चढण्याची जाणिव होते. किंवा तेव्हाच त्याला वरच्या पायरीवरील विचार पटतात. ठराविक पायर्‍यांवरील भोग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याला कितीहि वेळा सांगितले तरी वरच्या पायरीवरील विचार पटत नाहीत. व जेव्हा त्याचे त्या पायरीवरील भोग संपतात किंवा अनेक पूण्यकर्मे त्याच्या हातून होतात, तेव्हाच त्याला वरच्या पायरीवर चढता येते.

उदाहरणार्थ : एखादी व्यक्ती काही गुन्हा केल्याने जेलमध्ये जाते, तिथे तिला अनेक भोग भोगावे लागतात.
आणि जर जेलमध्ये त्याने वाईट वर्तन केले तर त्याची शिक्षा अधिक कठोर केली जाते. पण जर त्याने अनेकप्रकारे चांगले वर्तन केले तर मात्र त्याची शिक्षा शिथिल करून त्याबद्दल त्याचे कौतुक केले जाते. अगदी त्याचप्रमाणे आपल्याच कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात. पण आपण इथे चांगले वागून पुण्य करून आपले भोग कमी करू शकतो. चांगली कर्म करता करता आपली आपल्या इष्ट्देवतेबद्दल भक्ती कशी ऊत्कट होईल याकडे जर आपण जास्तीत जास्त लक्ष दिले तर आपले मन अधिकाधिक शांत होत जाईल व आपल्याला आपल्या जीवनाचे सार्थक करून देणारे आत्मज्ञानी सद्गुरू भेटतील व त्यांच्या आशिर्वादाने तुमच्या जीवनाचे सार्थक करणे अतिशय सोपे जाईल. व आपण सर्व पायर्‍या भराभर चढून जाऊ. पूर्णशुद्धतेपर्यंत.... आत्मसाक्षात्काराप्रत.....
मोक्षाप्रत.......!

|| Shri Gurudev ||